मुंबई आयआयटीची मदत घ्या, पण रेल्वे मान्सूनसाठी सुसज्ज करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पहिल्याच पावसात उपनगरीय लोकल सेवेच्या उडालेल्या गोंधळाची दखल रेल्वेमंत्र्यांनी घेत रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे सुसज्ज राहावे असे आदेश दिले आहेत. तसेच मान्सूनच्या पूर्वतयारीसाठी रेल्वे करीत असलेल्या तांत्रिक आणि सिव्हिल कामांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांची मदत घ्यावी असेही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

मान्सूनच्या पहिल्याच तडाख्यात उपनगरीय लोकल सेवा कोलमडली. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱयांशी दूरचित्रप्रणालीद्वारे संवाद साधत त्यांना फैलावर घेतले. यावेळी रेल्वेने केलेल्या मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. रेल्वेने नवनवे प्रयोग आणि कठोर परिश्रम घेत प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी तत्पर राहावे. मुंबई आयआयटीसारख्या संस्थांची सल्लागार म्हणून मदत घ्यावी आणि तांत्रिक आणि सिव्हिल कामांची गुणवत्ता वाढवावी असे यावेळी त्यांनी अधिकाऱयांना निर्देश दिले. यावेळी मध्य रेल्वेने 1.5 आणि पश्चिम रेल्वेने 2.1 असे मिळून 3.6 लाख क्युबिक मीटर कचरा उचलला असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या बैठकीला रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि मुंबईतील अधिकारी उपस्थित होते.