
मुंबईतील रेल्वेचे पूल, दरडी कोसळण्याच्या घटना घडतात तो मुंबई-पुणे महामार्ग, महापुराचा फटका बसलेले केरळ आदी ठिकाणी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वाचे सल्ले देणाऱया पवईच्या आयआयटी मुंबईतील तज्ञांना देशातील इतर राज्यांच्या सरकारांनीही साद घातली आहे. ओडिशा सरकारने त्यांच्या राज्यातील दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी आयआयटी मुंबईतील तज्ञांना पाचारण केले आहे.
दरड कोसळणे, पूल कोसळणे, भूकंप आदी दुर्घटनांनंतर पवईच्या आयआयटी मुंबईतील तज्ञांची भूमिका महत्वाची ठरते. आयआयटीतील तज्ञांकडून त्या जागांचे सर्वेक्षण करून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी सल्ला घेतला जातो. ओडिशामध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटना मोठय़ा प्रमाणात झाल्या. त्यात जीवितहानीही झाली. दरडी कोसळू शकतात अशी ठिकाणे निश्चित करून भविष्यात जीवितहानी टाळता येऊ शकते. आयआयटी मुंबईतील तज्ञांकडून अशा ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणांच्या परिसरात राहणाऱया नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
1999 मध्ये ओडिशात आलेल्या चक्रीवादळात 10 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला वीस वर्षे पूर्ण झाली. गेल्या वर्षी आलेल्या तितली चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून 40 नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य दुर्घटनांचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने आयआयटी मुंबईतील तज्ञांची मदत घेतली आहे.

























































