मुंबई इंडियन्सचा अपशकुनावर विजय, अखेर 13 वर्षांनी सलामीहाराला चिरडले; वानखेडेवर मुंबईकरांची आतषबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2013 पासून मुंबई इंडियन्सच्या मागे लागलेला सलामीहारचा अपशकुन अखेर 13 वर्षांनी आपल्या घरच्याच वानखेडे स्टेडियमवर चिरडला गेला. मुंबईला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गेली 13 वर्षे कधीही विजय मिळवता आला नव्हता. आज रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या षटकारबाजीने कोलकाता नाइट रायडर्सचे 221 धावांचे प्रचंड आव्हान 5 चेंडू आणि 6 विकेट राखून सहज पार काढत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 19 व्या हंगामाची यादगार आणि जोरदार सुरुवात केली. 39 धावांत तीन विकेट टिपणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला.

अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशीच्या झंझावाताने मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचे आव्हान रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या घणाघाती फलंदाजीने खूपच माफक करून टाकले. या सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत 11.5 षटकांत 148 धावांचा पाऊस पाडत मुंबईचा सलामीहाराचा अपशकुन संपण्याचे संकेत दिले. आज दोघेही शतक झळकावणार असे वाटत असतानाच रोहितची 38 चेंडूंतील 78 धावांची खेळी थांबली. त्याने 6-6 षटकार-चौकार ठोकले. मग रिकल्टनचेही शतक 19 धावांनी हुकले. त्याने 8 षटकार खेचले. मग सहज विजयाची औपचारिकता कर्णधार हार्दिक पंडय़ाने 3 चौकार खेचत पूर्ण केली.

त्याआधी अस्सल मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशी यांच्या दमदार-झंझावाती अर्धशतकी खेळींनी कोलकाता नाइट रायडर्सला 4 बाद 220 अशी जोरदार धावसंख्या उभारून दिली. नाणेफेक करताना रहाणेने ‘वानखेडेवर इतके गवत कधीच पाहिले नसल्याचे म्हटले, पण त्या अतिरिक्त गवताचाही त्याच्या फलंदाजीवर काही परिणाम झाला नाही. त्याने केवळ 40 चेंडूंत 67 धावांची आक्रमक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दुसरीकडे तरुण अंगक्रिष रघुवंशीनेही 29 चेंडूंत 51 धावांची स्पह्टक खेळी करत त्याला साथ दिली. सलामीला आलेल्या रहाणेने फिन अॅलनसह 5 षटकांत 69 धावांची सलामी दिली. त्यानंतर पॅमरून ग्रीनच्या साथीने 40 धावा जोडल्या. मग रघुवंशीसह 36 धावांची भर घातल्यानंतर रहाणेचा झंझावात शांत झाला. त्यानंतर रघुवंशीने रिंकू सिंहसह 60 धावांची फटकेबाजी करत संघाला द्विशतकापार पोहोचवले.

ठाकूरचे मॅच विनिंग पदार्पण

मुंबईकडून पदार्पण करणाऱया शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेत काही प्रमाणात लगाम घालण्याचा प्रयत्न केला, तर जसप्रीत बुमराने नेहमीप्रमाणे किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र कोलकात्याने पॉवर प्लेमध्येच 78 धावा करत आणि अवघ्या 7.5 षटकांत शतक पार करत मुंबईवर दबाव आणला. रघुवंशीचा रोहित शर्माने सोडलेला झेल महागात चांगलाच पडला. कारण त्यानंतर त्याने आक्रमण अधिक तीव्र केले. शेवटी कोलकात्याने 4 बाद 220 अशी भक्कम मजल मारली.