
कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकजण जीव धोक्यात घालून काम करीत असताना कांदिवलीत खासगी सोसायटीत तब्बल 390 जणांना केवळ सुई ‘टोचून’ लाखो रुपये कमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बुधवारी एकच खळबळ उडाली आहे. लसीकरण झालेल्या खासगी सोसायटीमधील रहिवाशांनीच आपली फसवणूक झाल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात केल्याने ही बाब समोर आली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत 30 मे रोजी लसीकरण करण्यात आले. खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याची ओळख सांगत काही दलालांनी हे लसीकरण करून घेतले. मात्र लसीकरणाच्या वेळी लाभार्थ्यांना पह्टो काढू देण्यात आले नाहीत. लसीकरणानंतर प्रमाणपत्र तीन वेगवेगळ्या केंद्रांची नावे आली. शिवाय वेगवेगळी तारीखही नोंदवण्यात आली. शिवाय लस घेतल्यानंतर 390 पैकी बहुतांशी जणांमध्ये लसीकरणानंतर दिसणारी सौम्य लक्षणेही दिसली नाहीत. त्यामुळे घेतलेल्या लसीबाबत लाभार्थ्यांना संशय आला. ही फसवणूक असल्याचे सांगत रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ना पावती, ना फोटो, ना अॅपवर नोंद
कोरोना लसीकरण हे रीतसर कोविन अॅपवर नोंदणी करून केले जात आहे. खासगी केंद्रावर लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना रीसतर पावतीही देण्यात येत आहे. मात्र या लसीकरणात लाभार्थ्यांना कोणतीही पावती देण्यात आली नाही. लसीकरण करताना फोटो ही काढू देण्यात आला नाही. शिवाय अॅपवर नोंदणीही करण्यात आली नाही. रहिवाशांकडून 1260 रुपये मात्र शुल्क घेण्यात आले.
पालिका म्हणते अशी घ्या खबरदारी!
- खासगी संकुलात खासगी केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्याआधी पालिकेने तयार केलेल्या मसुद्यानुसार करार करून घेणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया करताना पालिकेच्या स्थानिक प्रभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱयाशी संपर्क साधावा.
- प्रत्येक लसीकरण केंद्राला विशिष्ट नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. हा नोंदणी क्रमांक पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱयांकडून पडताळून पहावा. लसीकरण झाल्यानंतर 48 तासात प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.
48 तासांत चौकशी अहवाल द्या!
बोगस लसीकरणप्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी परिमंडळ – 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीला 48 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

































































