18 तास ढिगाऱयाखाली राहूनही अलिमा बचावली

57

सामना प्रतिनिधी। मुंबई

बिल्डिंग पडली, आता संसार कुठे थाटायचा? माझी मुले तर सुखरूप आहेत ना, त्यांना माझ्यासमोर आणा असे अलिमा बानू इद्रिसी (28)जे. जे.तील डॉक्टरांना सांगत होती. इमारत खचू लागल्यावर तिने दोन मुलांना मिठीत घेतले. 18 तास ती मुलांसोबत ढिगाऱयाखाली अडकून होती. बुधवारी सकाळी तिला ढिगाऱयाखालून सुखरूप बाहेर काढले पण तिची दोन मुले वाचू शकली नाहीत.

डोंगरीच्या तांडेल स्ट्रीट येथील केसरबाई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इद्रिसी कुटुंब राहायचे. मोहम्मद हा टेलरचे काम करतो. नेहमीप्रमाणे मोहम्मद हा घराबाहेर पडला. अलिमाबानोही घरात काम करत होती. इमारत खचू लागल्यावर अलिमाने अरबाज आणि शेहजादला मिठीत घेतले. तिच्या अंगावर लोखंडी चॅनल पडल्यामुळे ती दोन मुलांसोबत ढिगाऱयाखाली दबली गेली. ढिगाऱयाखालून ती मदतीकरिता आवाज देत होती पण ती कुठे अडकून पडली हे स्पष्ट होत नव्हते. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवले होते. बचावकार्यादरम्यान ढिगाऱयाच्या एका ठिकाणी एनडीआरएफचे श्वान भुंकले. त्यानंतर ढिगारा बाजूला केल्यावर एनडीआरएफच्या जवानांना अलिमाचा हात दिसला तेव्हा ढिगाऱयाखालून वाचवा असा आवाज आला. एनडीआरएफने तो ढिगारा बाजूला काढून त्या मायलेकांना बाहेर काढले. त्या तिघांनाही उपचाराकरिता जे. जे. रुग्णालयात नेले. अलिमाबानोच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली तर अरबाज आणि शेहजादला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शुद्धीत आल्यावर तिने आपली मुले सुखरूप आहेत ना असे डॉक्टरांना विचारले. अलिमाच्या दोन्ही मुलांवर तिच्या गावी अंत्यविधी केले जाणार आहेत.

शेवटचा मृतदेह सकाळी बाहेर काढला

इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा मोहम्मद हा टेलरचे काम करायचा. तो ढिगाऱयाखाली अडकून पडला होता. बुधवारी सकाळी त्याला ढिगाऱयाखालून बाहेर काढण्यात आले. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मृत्यूच्या सावटाखाली काढले दिवस

केसरबाई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जरीवाला कुटुंब राहत होते. आरशाक हा रात्री कामाला जाण्यासाठी झोपला होता तर त्याची आई साजिदा आणि भाची कश्यप आझाद या घरात होत्या. इमारत कोसळल्यामुळे ते तिघेही ढिगाऱयाखाली दबले गेले. आठ तासांनंतर साजिदाला ढिगाऱयाखालून बाहेर काढले. साजिदावर प्लॅस्टिक सर्जरी विभागात उपचार करण्यात आले तर आरशाक आणि कश्यपचा मृत्यू झाला. इमारतीची दुर्दशा पाहता ते नेहमीच भीतीत दिवस काढत होते.

मीरा रोडला जाणार होते राहायला
इमारतीच्या दुसऱया मजल्यावर सलमानी कुटुंब राहत होते. नावेद सलमानी हा त्या दिवशी उशिरा घराबाहेर पडला. घरात असताना अचानक आवाज आला. तो ढिगाऱयाखाली अडकून पडला होता. तासाभरानंतर नावेदला बाहेर काढले. त्याला हाताला आणि पायाला इजा झाली आहे. या दुर्घटनेत त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. नावेद हा कुटुंबीयांना घेऊन मीरा रोडला राहण्यासाठी जाणार होता पण तेथे जाण्यापूर्वीच ही घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या