
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये आज सकाळपर्यंत 13 लाख 15 हजार 423 दशलक्ष लिटर्स म्हणजे 91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी मुंबईकरांना ऑगस्ट 2021 पर्यंत पुरणार आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांत उर्वरित 10 टक्के पाणीकपातही मागे घेणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये या वर्षी जून, जुलैमध्ये कमी पाऊस झाल्याने ऑगस्टच्या सुरुवातीला केवळ 35 टक्केच पाणी जमा झाले. त्यामुळे मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, आता पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने यापैकी 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली. गुरुवारी रात्रीपासून तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे उर्वरित 10 टक्के पाणीकपातही एक-दोन मागे घेण्यात येईल, असे संकेत पालिकेने दिले आहेत.
आता केवळ 9 टक्के पाणीसाठय़ाची गरज
मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. 2019 मध्ये याच दिवशी 13 लाख 70 हजार 431 दशलक्ष लिटर म्हणजेच 95 टक्के पाणी जमा होते. मात्र, आज सकाळपर्यंत सात तलावांमध्ये 13 लाख 15 हजार 423 दशलक्ष लीटर्स पाणी जमा झाले आहे. त्यामुळे आता केवळ 1 लाख 31 हजार 940 दशलक्ष लीटर्सची आवश्यकता आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी आता केवळ 9 टक्के पाणीसाठा हवा आहे.
सातपैकी 4 तलाव ओक्हरफ्लो
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. 27 जुलैला तुळशी तलाव, 5 ऑगस्टला विहार तलाव तर 18 ऑगस्टला मोडक सागर तलाव तर 20 ऑगस्टला 7 वाजता तानसा तलावात भरून वाहू लागला आहे. मध्य वैतरणा 96 टक्के, भातसा 90 टक्के आणि अप्पर वैतरणामध्ये 72 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत 91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला की, उर्वरित 10 टक्के पाणीकपातही मुंबई महानगरपालिका तात्काळ मागे घेईल. –इकबालसिंह चहल, पालिका आयुक्त

























































