
मुंबईकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळावा यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आल्या. एसी लोकलमध्ये फर्स्ट क्लास पासधारकांना प्रवास करायला परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. ही मागणी जरी मान्य झाली नसली तरी ‘फर्स्ट क्लास’ पासधारकांना मधला फरक भरून आपला पास अपग्रेड करता येणार आहे.
पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 48 फेऱया सुरू केल्या आहेत, तर मध्य रेल्वे 56 एसी लोकल चालवत आहे. ज्यांनी नुकताच फर्स्ट क्लासचा पास काढला आहे, ज्यांना एसी फेऱयांतून प्रवास करण्याची इच्छा आहे, अशा प्रवाशांना आता मधला फरक भरून आपला फर्स्ट क्लासचा पास अपग्रेड करता येणार आहे. या पासचे प्रवास केलेले दिवस मात्र वजा केले जाणार नाहीत. पूर्ण तीस दिवसांचा पास काढावा लागणार आहे. आहे त्या पासमध्ये जास्त पैसे भरून एसी लोकलचा प्रवास मिळणार असला तरी त्याचा फायदा केवळ नुकताच फर्स्ट क्लासचा पास काढला आहे व एसीने प्रवास करण्याची इच्छा आहे, त्यांनाच होणार आहे.
पश्चिम रेल्वेची आकडेवारी
एकूण लोकल फेऱयांची संख्या – 1375
एसीची सरासरी प्रवासी संख्या – 55,500
एकूण एसी फेऱ्यांची संख्या – 48
पिक अवरच्या एसी फेऱया – 27
नॉन पिक अवर साध्या फेऱया – 589
विरार ते चर्चगेट सिंगल तिकीट जर्नी – 115 रु.
मासिक सिझन तिकीट – 2205 रु.
रेल्वे कर्मचाऱयांना एसी लोकलमधून मोफत प्रवास
रेल्वे कर्मचाऱयांना घर ते कार्यालय मोफत लोकल प्रवासासाठी रेसिडेन्सियल कार्ड पास दिलेला असतो. त्याआधारे आता त्यांना एसी लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.



























































