सोमवारपासून मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, प्रत्येक लोकलमधील प्रवासी क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज लोकलने प्रवास करणाऱया उपनगरीय प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्यांच्या 26 लोकलचे लवकरच 15 डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 21 नोव्हेंबरपासून या सेवेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक लोकलमधील प्रवाशी क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे.

लोकलमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या मार्गावर 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून जोर धरू लागली होती. त्यानुसार 15 डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील 15 डब्यांच्या लोकलची संख्या 106 वरून 132वर पोहोचणार आहे. मात्र लोकल फेऱयांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर दिवसाला लोकलच्या 1383 फेऱया होतात. यात वातानुकूलित लोकलच्या 79 फेऱयांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेने 1986 साली 12 डब्यांच्या तर 2009 साली 15 डब्यांच्या लोकल सेवेला सुरुवात केली होती. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने 12 डब्यांच्या 26 लोकल 15 डब्यांत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही दिशांना प्रत्येकी 13 सेवा दिल्या जातील. या 26 सेवांपैकी 10 सेवा जलद मार्गावर असतील. 21 नोव्हेंबरपासून या सेवेला सुरुवात होईल.

सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी