
प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून पारसिक बोगदा परिसरात प्रवासी पडण्याच्या वाढत्या घटना पाहून मुंब्रा आणि कळवा परिसरात रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे रुळांच्या शेजारी सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी उपाय शोधण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
कळवा-खारेगाव फाटकाजवळ 5 फेब्रुवारीला तीन जण लोकलमधून पडून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या परिसरात पारसिक बोगदा ओलांडल्यानंतर गाडीतून प्रवासी पडण्याचा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुंब्रा आणि कळवा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे लोकलमधून पडून होणाऱया अपघातांचा अभ्यास करता येणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे अपघाताचा अभ्यास करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर होणार आहे. कळवा स्थानकाजवळ त्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्याचे चित्रीकरण पाहून योग्य ते उपाय योजण्यास मदत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाने लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी बंद दाराच्या लोकल चालविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी साध्या लोकलला आपोआप बंद होणारे स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वेने केला होता, परंतु त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने तो प्रयोग मागे पडला. त्यामुळे रेल्वे बोर्डाने ऑटोमेटिक डोअरच्या एसी लोकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु या एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्या भाडय़ाच्या 1.3 पट जादा असल्याने प्रवाशांचा या एसी लोकलला विरोध होत आहे.
वेगावर नियंत्रण येणार
मुंब्रा आणि कळवादरम्यान एक कि.मी.च्या अंतरात अपघाताच्या दहा घटना घडल्या आहेत. बहुतांश अपघात धिम्या अप मार्गावर सीएसएमटी दिशेने जाणाऱया लोकलमध्ये सकाळच्या पिकअवरच्या गर्दीत घडले आहेत. त्यामुळे या भागात लोकलचा वेग कमी करण्याच्याही सूचना देण्यात आले आहेत.
दोन वर्षांत 1322 मृत्यू
2018 साली 711 जणांचा लोकलमध्ये पडून मृत्यू झाला होता, तर 2019 साली लोकलमधून पडून होणाऱया अपघातांत 611 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुर्ला लोहमार्ग पोलीस हद्दीत 73, डोंबिवली 44 आणि ठाणे लोहमार्ग पोलीस हद्दीत 45 जणांच्या मृत्यूची नोंद आहे, तर वाशी हद्दीतही 64 जणांचा मृत्यू झाला आहे.































































