रेल्वेने लोकल पासाचाही रिफंड द्यावा, रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी

1232

मुंबई उपनगरी लोकलचा प्रवास करताना अनेक जण त्रैमासिक ते वार्षिक रेल्वे पास काढत असतात. त्यामुळे अशा प्रवाशांचे सिजन तिकीट वाया गेल्याने ज्या तारखेला लोकल बंद झाली त्या तारखेपासूनचा त्यांना त्याचा परतावा द्यावा अशी मागणी होत आहे. रेल्वेने उपनगरीय लोकल चालू करण्यासंदर्भात अद्यापही काही संकेत दिले नसले तरी, अनेक उपनगरीय प्रवाशांचे लोकलच्या पासाचे पैसे वाया गेल्याने त्यांना देखील लोकल ट्रेन बंद असल्याच्या तारखेपासून ते पासाची मुदत असल्याच्या तारखेपर्यंतचा रिफंड देण्यात यावा अशी मागणी झेडआरयुसीसीचे सदस्य आणि मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पेर्येकर यांनी केली आहे.

61% प्रवाशांचा लोकल प्रवासाला विरोध
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये पुन्हा नेहमीसारखी गर्दी होईल का ? याबाबत मतमतांतरे असताना एम इंडिकेटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल 61% प्रवाशांनी लोकल सुरू होताच लागलीच लोकलचा प्रवास टाळण्याच्या बाजूने मतदान केले आहे. तर एकूण 40 टक्के प्रवासी ताबडतोब प्रवास करण्याच्या बाजूने असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. मुंबईत लॉकडाऊन शिथिल होऊन जर लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तर 61% प्रवाशांनी आपण लोकलने किमान एक ते दोन महिने तरी प्रवास करणार नाही असे म्हटले आहे. तर 39% प्रवाशांनी या प्रवासासाठी होकार दर्शवला आहे. एम इंडिकेटर या लोकल प्रवाशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ॲप्लिकेशन मार्फत हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. पन्नास हजारांहून अधिक प्रवाशांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या