
उपनगरीय लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी अद्यापही खुली न करण्यात आल्याने विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना तिकीट खिडक्यांवर तिकीट विकत मिळत नसल्याने त्यांच्याकडून विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे तिकीट तपासनीसांच्या कारवाईत मोठय़ा प्रमाणात विनातिकीट प्रवाशी सापडत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी घेतलेल्या मोहिमेत 538 केसेस दाखल करण्यात येऊन 1 लाख 28 हजार 245 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सीएसएमटीत शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 4 दरम्यान विशेष पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.
या पथकात 60 तिकीट तपासनीस आणि दहा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सोबत होते. या वेळी विनातिकीट आणि इतर असे एकूण 538 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण 1 लाख 28 हजार 245 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.




























































