लोकलच्या वेळा बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर तिकीट घरांवर चाकरमान्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ठरावीक वेळेतच तिकीट आणि ठरावीक वेळेतच लोकल यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार घेत असून येत्या काळात लोकलच्या वेळेत काही बदल अपेक्षित असतील तर ते करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लोकलच्या वेळांमुळे होत असलेल्या गैरसोयीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘लोकांची सोय हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवलं जाईल. लोकांचं हित हेच अंतिम महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच दृष्टीने काम केलं जाईल. त्यामुळे काही बदल अपेक्षित असेल तर ते करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील. लोकलच्या वेळा नक्कीच बदलू शकतात. लोकांचं हित आणि गरज त्यांच्या संदर्भाने सोयीचं असणं महत्त्वाचा विषय आहे. सुधारणा होण्याची गरज असेल तर आमचा विभागदेखील कळवेल आणि राज्य सरकारही त्यासंदर्भात निर्णय घेईल.’’