
मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिवाळीच्या मुहूर्तावर गुरुवार दि. 28 ऑक्टोबरपासून आपल्या शंभर टक्के लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकल प्रवास करू शकत होते. तसेच 15 ऑक्टोबरपासून 18 वर्षांखालील मुलामुलींना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून दररोज 60 लाख प्रवासी प्रवास करीत असल्याचे म्हटले जात आहे. तर 15 ऑगस्टपासून आतापर्यंत सर्वसामान्य रेल्वे पासधारकांची संख्या 22 लाखांच्या पुढे गेली आहे. वाढती प्रवासी संख्या पाहून रेल्वेने कोविड काळापूर्वीप्रमाणेच दररोजच्या लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
22 मार्च 2020पासून कोविड साथीमुळे रेल्वे सेवा संपूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर 15 जून 2020पासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या. ऑगस्ट 2021पासून विविध वर्गवारीतील केंद्र आणि राज्य सरकारच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. सध्या मध्य रेल्वे दररोज 1702 तर पश्चिम रेल्वे 1304 लोकल फेऱ्या चालविते व एकूण फेऱ्यांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण 95.70 टक्के इतके आहे. आता 28 ऑक्टोबरपासून उपनगरीय फेऱ्या कोविडपूर्व काळाप्रमाणे चालविण्यात येतील, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त पत्रक काढून म्हटले आहे. आता मध्य रेल्वे गुरुवारपासून नेहमीच्या काळानुसार 1774 आणि पश्चिम रेल्वे 1367 फेऱ्या चालविणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या वर्गवारीतील प्रवाशांनाच कोविडचे नियम पाळून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

























































