
गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी मर्यादित भागांपुरती आपली सेवा अखेर सुरु केली आहे. डबेवाल्यांसाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नसल्याने सायकलच्या माध्यमातून ज्याठिकाणी सेवा पुरविणे शक्य होणार आहे, त्याठिकाणी ही सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेला लॉकडाऊन लक्षात घेता गेल्या पाच महिन्यांपासून अधिक काळ मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद होती. परंतु सध्या मुंबईतील अनेक भागात लॉकडाऊन खुले करण्यात आले असल्याने अनेकांनी डबेवाल्यांना सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर चाकरमान्यांच्या आग्रहास्तव मुंबईच्या डबेवाल्यांची काही मर्यादित भागांत आपली सेवा सुरु केली आहे. दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये ज्या ठिकाणी सायकलच्या माध्यमातून सेवा पुरविणे शक्य आहे, त्याठिकाणी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यात मुंबईतील 40 ते 50 डबेवाले सहभागी झाले असून त्यांनी आपली सेवा सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबद्दल मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळकेर म्हणाले की, मुंबईतील लोकल सेवा डबेवाल्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. अद्याप आम्हाला त्यात प्रवेश देण्यात आलेला नसला तरी आम्ही आमची सेवा सुरु केली आहे. शक्य आहे, त्याठिकाणी सायकलवर डबे पोहचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील काही भागात ही सेवा सुरु करण्यात आली असून डबेवाल्यांसाठी ज्यावेळी लोकल सेवा जेव्हा सुरू करण्यात येईल, तेव्हा डबेवाले आपली सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

























































