
सर्वाधिक 41 वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबईचा यंदाच्या रणजी मोसमातला खेळ शुक्रवारी खल्लास झाला. कमलेश मकवाना व धमेंद्र जाडेजा या जोडीने आठव्या विकेटसाठी 40 षटकांमध्ये 75 धावांची संयमी भागीदारी करीत मुंबईच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लावला. मुंबई-सौराष्ट्र यांच्यामधील एलिट ‘ब’ गटातील लढत ड्रॉ राहिली आणि मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. 2015-16 सालानंतर मुंबईला रणजीचे जेतेपद पटकावता आलेले नाही ही खेदजनक बाब.
मुंबईने शुक्रवारी 3 बाद 285 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. शम्स मुलानीने 92 धावांची आणि कर्णधार आदित्य तरेने नाबाद 28 धावा तडकावल्या. त्याआधी सूर्यकुमार यादवने 134 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. मुंबईने दुसरा डाव 7 बाद 362 या धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळे सौराष्ट्रासमोर विजयासाठी 290 धावांचे आव्हान उभे ठाकले.
अतार्डे, मुलानीची प्रभावी गोलंदाजी पण…
मुंबईला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी उरलेल्या दोन्ही सामन्यांत निर्णायक विजयासाठी आवश्यकता होती. त्यामुळे मुंबईने या लढतीत सौराष्ट्राला हरवणे अपेक्षित होते. शशांक अतार्डे व शम्स मुलानी या दोन गोलंदाजांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद करीत सौराष्ट्राची अवस्था 7 बाद 83 धावा अशी केली, पण दोघांच्या प्रयत्नांना यश लाभले नाही. कमलेश मकवाना (नाबाद 31 धावा) व धमेंद्र जाडेजा (नाबाद 33 धावा) या जोडीने खेळपट्टीवर नांगर टाकला. मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. सौराष्ट्राने चौथ्या दिवसअखेरीस 7 बाद 158 धावा केल्या. अखेर लढत ड्रॉ झाली. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राला 3 गुण मिळाले. यामुळे त्यांचाही बाद फेरीचा अडसर दूर झाला.
स्टार खेळाडू देशासाठी खेळताहेत
मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसला. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे हे खेळाडू हिंदुस्थानसाठी खेळत असल्यामुळे त्यांना मुंबईसाठी खेळता आले नाही.
चार मोसम जेतेपदापासून दूरच
मुंबईने 2015-16 सालामध्ये सौराष्ट्राला अंतिम फेरीत हरवून रणजी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर मात्र मुंबईला ही मानाची स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यानंतर गुजरातने मुंबईला हरवत अजिंक्यपदावर नाव कोरले. मागील दोन मोसमांत विदर्भाने रणजी स्पर्धा जिंकली. यंदाही मुंबईचा खेळ साखळीतच संपला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई – पहिला डाव 262 धावा
सौराष्ट्र – पहिला डाव 335 धावा
मुंबई – दुसरा डाव 7 बाद 362 धावा (डाव सोडला)
सौराष्ट्र – दुसरा डाव 7 बाद 158 धावा
























































