चोरट्याने बँकेतून डीव्हीआर चोरला

385

मालाड पश्चिमच्या मार्वे रोड येथील कपोल को-ऑपरेटिव्ह बँकेत चोरटय़ाचा चोरीचा प्रयत्न फसला. बँकेत लावलेली सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन चोरून चोरटय़ांनी पळ काढला. चोरीप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मार्वे रोड येथे कपोल कॉपरेटिव्ह बँक आहे. आरबीआयने 2014 मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासकाची नेमणूक केली होती. 2017 पासून सहा महिन्यांतून एकदा खातेदारांना 3 हजार रुपये काढण्याची मुभा आरबीआयने दिली आहे. त्यामुळे बँकेत अंतर्गत कामे चालतात. परिणामी बँकेत जास्त पैसे ठेवले जात नाहीत. दिवाळीनिमित्त लागून सुट्टय़ा आल्याने बँक बंद होती. बुधवारी सकाळी बँकेच्या कर्मचाऱयाने बँक उघडली तेव्हा चोरीचा प्रकार समोर आला. अज्ञात चोरटा बँकेचे लॉक तोडून आत शिरला मात्र त्याला जास्त रक्कम मिळाली नाही. कॅशियरच्या ड्रॉवरमध्ये असलेली काही किरकोळ रक्कम घेऊन त्याने पळ काढला. पोलीस पकडू नयेत म्हणून चोरटय़ाने सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून पळ काढला. बँकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. तपासाकरिता एक पथक तयार केले आहे. बँक परिसराबाहेर सुरक्षारक्षक तैनात नसतो. तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या