
मालवण समुद्रात पॅरासेलिंग सफर करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा बोटीतून समुद्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अझर अन्सारी (32) असे मृत तरुणाचे नाव आहे.
साकिनाका मुंबई येथून अझर व हीनाबी हे पती-पत्नी 3 जानेवारीला गोवा येथे पर्यटनासाठी आले. दोन दिवस गोवा पर्यटन केल्यावर दोघेही रविवारी मालवण येथे पर्यटनासाठी आले. स्कुबा व वॉटर स्पोर्ट्स त्यांनी केले. त्यानंतर दुपारच्या सुमारास मालवण दांडी बीच येथून हे दोघे बोटीतून पॅरासेलिंगसाठी समुद्रात गेले होते. बोटीत आणखीही पर्यटक होते. सर्वांनी लाईफ जॅकेट घातले होते. अझर व हिनाबी यांनी पॅरासेलिंग केले व बोटीत बसले. काही वेळाने अझर यांनी लाईफ जॅकेट काढून ठेवले व बोटीच्या प्लँटफॉर्म वर बसले. काही वेळात बोटीत आरडाओरडा सुरू झाला. यावेळी मला माझे पती समुद्रात पडल्याचे कळले, असे हिनाबी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तोल जावून अझर हे समुद्रात पडल्याचे बोलले जात होते.
बोटीतील गाईड व अन्य जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेत अझर यांना पाण्याबाहेर काढले. प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. बोट किनाऱ्यावर आणत अझर यांना रुग्णालयात दाखल केले. पर्यटन व्यवसाईक व लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारापूर्वी अझर यांचा मृत्यू झाला.
15 दिवसात पाचवी घटना
मालवण किनारपट्टीवर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेची नेहमी काळजी घेतली जाते. मात्र काही वेळा अपघात घडतात. गेल्या 15 दिवसात मालवण व देवबाग येथे छोटे मोठे 5 अपघात घडले.
























































