
विलेपार्ले येथे राहणाऱया एका 59 वर्षीय निवृत्त व्यक्तीचे अंधेरीतून अपहरण झाले होते. दोन महिन्यांनंतर त्या व्यक्तीचा गुजरातमधील ब्राह्मणी डॅममध्ये मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत सापडला होता. गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने मृतदेहाजवळ सापडलेल्या विमानाच्या पीएनआर तिकिटावरील नंबरवरून गुह्याचा छडा लावत तिघा आरोपींना गजाआड केले.
एअर इंडियातून स्वेच्छानिवृत्ती घेणारे दीपक पांचाळ हे 27 सप्टेंबरपासून बेपत्ता झाले होते. अंधेरी पोलीस ठाण्यात पांचाळ यांचे अपहरण झाल्याची नोंद होती. तीन इसमांनी पांचाळ यांचे अपहरण केल्याचे समोर आल्यानंतर युनिट-10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली एपीआय धनराज चौधरी तसेच राजेश मोरे, राजेश चिकणे या पथकाने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. 29 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या मोरबी जिह्यातील ब्राह्मणी डॅममध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह गोधडीमध्ये गुंडाळून बांधण्यात आला होता. त्या गोधडीमध्ये पोलिसांना पाच हजारांची रोकड आणि एअर इंडियाचे एक पीएनआर तिकीट सापडले होते. त्या तिकिटावर असलेल्या नंबरवरून पोलिसांनी तपास केला असता मृत व्यक्ती ही दीपक पांचाळ असल्याचे निष्पन्न झाले. या गुह्याची माहिती असलेल्या एका इसमाची कॉन्स्टेबल महेश घाणेकर यांना माहिती मिळाली. साक्षीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली, राजस्थान, गुजरात असा तपास करीत पांचाळ यांच्या मारेकऱयांचा शोध घेतला. त्यानंतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून जुनागड परिसरात लपून बसलेल्या जयंतीभाई पटेल (64), गोपाळ परमार (27) आणि राजू अगन (35) या तिघांना पकडले. आरोपींनी गुह्याची कबुली दिल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
पैशांच्या व्यवहारातील मध्यस्थीपणा भोवला
दीपक पांचाळ यांनी मध्यस्थी करीत मनी लॉण्डरिंग करणाऱया जयंतीभाई याच्याकडून 54 लाख मिळवून दिले होते, पण ती व्यक्ती जयंतीभाईचे पैसे परत करत नव्हती. वारंवार वेगवेगळी कारणे सांगून टाळत होती. 27 सप्टेंबर रोजी आरोपीने त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता तो मुंबईत असून तुम्हीही इथे या असा म्हणाला. त्यानुसार आरोपी बडोद्याहून मुंबईत आले, पण त्या इसमाने गुजरातला निघून आल्याचे सांगितले. त्यामुळे जयंतीभाईने दीपक पांचाळ यांना अंधेरीत बोलावले आणि त्याच्या गाडीतून सोबत नेले.
रात्रभर गाडीत मारहाण
जयंतीभाईसोबत आणखी दोघे होते. गाडीमध्ये त्यांची पैशांवरून वादावादी झाली. तेव्हा संतापलेल्या तिघांनी दीपक पांचाळ यांना धावत्या गाडीतच मारहाण करण्यास सुरुवात केली. सकाळी ते बडोद्यातील जयंतीभाईच्या मित्राच्या फार्महाऊसवर पोहोचले असता दीपक पांचाळ यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोपी दीपक यांचा मृतदेह बडोद्यापासून 600 किमी लांब असलेल्या मोरबी येथील मित्राच्या फार्महाऊसवर घेऊन गेले. तेथे त्यांनी मृतदेह गोधडीमध्ये पॅक करून तो ब्राह्मणी डॅममध्ये फेकला होता.
























































