ओएलएक्सवर गाडय़ा विकणाऱयांना चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

ओएलएक्सवर गाडी विकणाऱयांशी संपर्क साधायचा. मग प्रत्यक्ष मालकाला भेटून थोडे पैसे आणि उर्वरित पैशांचा न वटणारा धनादेश द्यायचा. गाडीची चावी, कागदपत्र हाती पडले की गाडी घेऊन पसार व्हायचे आणि ती कार तिसऱया व्यक्तीला चढय़ा भावाने विकायची. अशा प्रकारे ओएलएक्सवरील गाडय़ांचा झोल करणाऱया भामटय़ाच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मुसक्या आवळल्या आहेत.

ओएलएक्सवर कार मालकांशी संपर्क साधून एक भामटा त्यांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विविध पोलीस ठाण्यांत असे फसवणुकीचे गुन्हे दाखल होत होते. ओएलएक्सवर गाडय़ा विकणाऱयांना भामटा पवई परिसरात येणार असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील माने तसेच अशोक सावंत, सुनील कांगणे, विनोद पद्मन, आनंदा गेंगे, संतोष औटे, संदीप पाटील व किरण जगदाळे या पथकाने पवई परिसरात सापळा रचला. त्या ठिकाणी एका कारमालकाला चुना लावण्यासाठी मोहम्मद अय्याज अब्दुल अजिज सय्यद (28) हा तेथे येताच माने व त्यांच्या पथकाने सय्यदवर झडप टाकली. या वर्षात सय्यदने गोरेगाव, एमआयडीसी, ओशिवरा, बांगूरनगर व उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचे गुन्हे केल्याचा कबुली दिली. त्याच्याकडून बांगूरनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या फसवणुकीतून गाडय़ा जप्त करण्यात आल्या. अधिक कारवाईसाठी सय्यदला बांगूरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी फसवाफसवी
सन 2018 मध्ये सय्यदविरोधात अशा प्रकारच्या फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुह्यांत त्याला अटकदेखील झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा फसवाफसवी करायला सुरुवात केली.

एकाची गाडी घेऊन दुसऱयाला विकायची
ओएलएक्सवर गाडय़ा विकणाऱयांना सय्यद हेरतो. संबंधिताला संपर्क साधून तो त्यांना प्रत्यक्ष भेटतो आणि मालकाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे देण्याच्या तयारी दाखवतो. विश्वास बसावा म्हणून थोडेफार पैसे तेथेच मालकाला देतो. मग उरलेल्या पैशांचा न वटणारा धनादेश देऊन गाडी व गाडीचे कागदपत्र ताब्यात घेतो. तिकडून सटकला की मोबाईल बंद करतो आणि ती गाडी दुसऱयालाच जास्त किमतीत विकतो. मित्राची गाडी असून पैशांची गरज असल्याने गाडी विकत असल्याचे तो भासवतो.