दहिसर, भांडुप, माहुलमध्ये कांदळवनाची सफर, पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा निर्णय

पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने कांदळवन उद्यान उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गोराई येथे 25 कोटी रुपये खर्चून उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर आता दहिसर, भांडुप, माहुलमध्येही कांदळवन उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण मनोरा आणि कांदळवनातील काचेच्या पुलावरून निसर्ग न्याहाळता येणार
आहे.

मुंबई आणि नजीकच्या भागातील कांदळवनाचा वाढता ऱहास विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने कांदळवन ऱ्हास कक्षाची 2012 मध्ये निर्मिती केली. या कक्षाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रातील कांदळवनांच्या संरक्षणविषयक उपाययोजनांची कामे हाती घेतली. 2013 मध्ये शासकीय जागेवरील कांदळवनांचा आरक्षित वने हा दर्जा वाढवून राखीव वने असा केला आहे. मुंबई आणि नजीकचा विभागांमधील कांदळवन ऱहासावर विशेष नियंत्रण ठेवण्यासाठी 2014 मध्ये मुंबई कांदळवन साधारण घटकांची निर्मिती करण्यात आली.

कांदळवन संरक्षणअंतर्गत कांदळवनावरील अतिक्रमण, प्रदूषण, औद्योगिकरण आणि घनकचरा प्रदूषण धोक्यांना लक्षात घेऊन एक विशेष विभाग कांदळवन विभाग उत्तर कोकण निर्माण करण्यात आला.

  • कांदळवन क्षेत्रातील गस्त वाढवण्यात आली तसेच मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली.
  • कांदळवन क्षेत्रात अनधिकृतपणे उभारलेल्या झोपडय़ांना जागा खाली करण्याच्या सूचना देत मागील वर्षी 65 झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील विविध किनारी जिह्यांमध्ये रोपवन करण्याकरिता कांदळवन कक्षाने विविध ठिकाणी रोपवाटिका तयार केली आहे. तसेच मागील वर्षी एकूण 46 हेक्टर क्षेत्रावर मुंबई आणि ठाणे किनारी प्रदेशातील 3 ठिकाणी कांदळवन रोपवन करण्यात येत आहे. याअंतर्गत 2,04,601 कांदळवन रोपे लावण्यात आली. समुद्रातील महाकाय प्राण्यांचा संग्रहालय बनवण्याचा कक्षाचा प्रयत्न आहे. या संग्रहालयात प्रत्यक्ष पाण्याच्या आकाराची प्रात्यक्षिके ठेवली जाणार आहे, यात मोठा स्क्विड, व्हेल शार्क तसेच इतर सागरी प्राण्यांचे सांगाडेही ठेवण्यात येणार असल्याची माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली.