
सामना प्रतिनिधी। मुंबई
गेल्या पाच वर्षांत सातत्याने माणसांच्या नागरी स्वातंत्र्यावर, व्यक्त होण्यावर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या निष्ठांवर संशय घेऊन त्यांना राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे, त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण केली जात आहे. या समाजविघातक प्रवृत्तीचा केवळ निषेध करून भागणार नाही तर ठोस कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करून देशाच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडूया, असे आवाहन मराठी लेखक, प्रकाशक यांनी सोमवारी केले.
भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, राजीव नाईक, येशू पाटील, प्रदीप चंपानेरकर, अरुण खोपकर, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, शफाअत खान, रामदास भटकळ, शांता गोखले, हरिश्चंद्र थोरात, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, नीरजा, प्रज्ञा दया पवार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, प्रवीण बांदेकर, संध्या नरे-पवार, हरी नरके, संजय पवार, अरुणा सबाने, सतीश तांबे, सतीश काळसेकर, आसाराम लोमटे, नागनाथ कोत्तापल्ले, प्रेमानंद गज्वी, अशोक बागवे, अरुण शेवते, संध्या गोखले, मिलिंद चंपानेरकर, प्राजक्त देशमुख, धर्मकीर्ती सुमंत, अतुल पेठे, रवींद्र लाखे, मनस्विनी लता रवींद्र, रमेश इंगळे-उत्रादकर, किरण यज्ञोपवीत, प्रणव सखदेव, प्रशांत पवार, आशीष पाथरे आदी लेखक, प्रकाशन संपादकांनी मतदारांना ‘व्यर्थ न हो मतदान’ पत्रकाद्वारे आवाहन केले.
मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरूया!
मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरूया. आपल्या मनात दुसऱया धर्माबद्दल, दुसऱया जातीबद्दल, दुसऱया माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱया शक्ती ओळखून, जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगविण्यामागचे राजकारण जाणून घेऊया आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊया असे लेखकांनी म्हटले आहे.




























































