
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई मॅरेथॉनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. आता या शर्यतीला गोल्ड लेबलचा दर्जा देण्यात आला आहे. ‘आयएएएफ’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशनकडून या मानाच्या शर्यतीला हा मान देण्यात आला आहे. 20 जानेवारी 2019 रोजी मुंबई मॅरेथॉनचे 16 वे पर्व पार पडले जाणार आहे. तब्बल 46 हजार स्पर्धक या स्पर्धेत भाग घेणार आहेत. कोणत्याही मॅरेथॉन स्पर्धेला गोल्ड लेबलचा दर्जा देत असताना ‘आयएएएफ’चे काही निकष ठरवले गेलेले असतात.
स्पर्धेचे एकंदरीत नियोजन, धावपटूंसाठीच्या केलेल्या सोयीसुविधा, स्त्री-पुरुष विजेत्यांना मिळणारी बक्षिसाची रक्कम, वैद्यकीय सुविधा, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, प्रसारमाध्यमांमध्ये होणारी चर्चा यावरून ‘आयएएएफ’ स्पर्धेला गोल्ड लेबलचा दर्जा प्रदान करत असते. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर हा दर्जा देण्यात आल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केले.




























































