
घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील मेट्रो सेवा सोमवार 19 ऑक्टोबर सकाळी 8.30 पासून काही अटी व शर्ती पाळून सुरू करण्यात येत असून मेट्रोमध्ये सर्वसामान्य प्रवासीही प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी कोविड-19 संदर्भातील नव्या ‘एसओपी’ जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक प्रवाशांचे तापमान प्रवेशद्वारावर तपासण्यात येणार आहे. मास्क परिधान करणे तर बंधनकारक असणारच आहे, प्रवाशांना मेट्रोत एक आसन सोडून बसावे लागणार आहे. तसेच एका ट्रेनमध्ये साधारण तीनशे प्रवाशांना प्रवेश असणार आहे. दिवसातील फेऱया निम्यावर आणण्यात आल्या असून केवळ 200 फेऱया चालविण्यात येणार आहेत.
मुंबई मेट्रो वनला सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या घेण्यात आल्या असून ती सोमवारपासून प्रवाशांच्य सेवेसाठी सज्ज झाली आहे. तर मोनोरेल तर तिच्या आधीच रविवारपासून सुरू होत आहे. मेट्रोच्या संपूर्ण स्टाफला प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविण्यात आली आहेत. प्रवाशांना मास्क परिधान करणे आणि सॅनिटायझर बॉटल जवळ बाळगणे तसेच आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवेश असला तरी मेट्रोमध्ये आजारी नसलेला म्हणजेच लक्षणे नसलेला कोणीही सर्वसामान्य प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मेट्रो वन प्रशासनाने दोन प्रवाशांमध्ये अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल केले आहेत. त्यानुसार आसनांवर विशिष्ट खुणा केल्या असून ती आसने रिक्त ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे एक आसन सोडून प्रवाशांना बसता येणार आहे. प्रवाशांना अंतर सोडून उभे राहण्यासाठी लादीवर स्टीकर चिकटण्यात आले असून तेथे उभे राहावे लागणार आहे. असे स्टीकर तिकीट काऊंटरजवळ, सिक्युरिटी चेक पॉईंट्स, सरकते जिन्याचे गेट, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्येही लावण्यात आले आहेत.
प्लास्टिक टोकनचा वापर बंद करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढण्यास प्रोत्साहन दिले जाईल. मेट्रो स्मार्टकार्डचा वापरही वाढवला जाईल. हे पर्याय वापरता न येणाऱयांना छापील ‘क्यूआर’ तिकीट मिळेल. घाटकोपर ते वर्सोवा या टप्प्यात एका वेळी एका मेट्रो गाडीतून 300च्या आसपास प्रवासी प्रवास करू शकतील.
साडेसहा मिनिटांना एक फेरी
लॉकडाऊनपूर्वी पिकअवरमध्ये तर तीन मिनटांना एक फेरी व्हायची आता दर साडेसहा मिनिटांना एक फेरी होणार आहे. तर नॉन पिकअवरला आता दर साडे आठ मिनिटांना एक फेरी होणार आहे. एरव्ही दिवसाला 400 हून अधिक फेऱया व्हायच्या आता 200 फेर्या होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. डब्यात एसीचे तापमान 25 ते 27 डिग्री सेंटीग्रेड असेल. डब्यात फ्रेश हवा येण्यासाठी एसी डम्पर उघडे ठेवले जातील, प्रत्येक स्थानकात गाडीचे दरवाजे 30 ते 60 सेंकद उघडे असतील. तर सुरूवातीच्या स्थानकांत ते 150 ते 180 सेंकद उघडे ठेवण्यात येतील.



























































