मुंबईत मोटरमनशिवाय मेट्रो धावणार, स्वदेशी बनावटीची पहिलीच मेट्रो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आता मोटरमनशिवाय मेट्रो धावणार आहे. 27 जानेवारी रोजी बंगळुरू येथून ही मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होणार असून स्वदेशी बनावटीची ही मेट्रो दहिसर ते डी.एन. नगर (दोन अ) आणि अंधेरी ते दहिसर (सात) या मार्गांवर धावणार आहे. मे 2021पासून हे दोन मार्ग खुले करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

चारकोप मेट्रो कारशेडमध्ये

22 जानेवारीला मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील कोच बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि 27 जानेवारीपर्यंत ते चारकोप मेट्रो कारशेडमध्ये येतील. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ट्रायल रन सुरू होईल. दोन्ही मार्गिकांसाठी 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. या मार्गांवर 96 ट्रेन कार्यान्वित करण्याचे नियोजन असून कोचची संख्या 576पर्यंत वाढणार आहे. पहिल्या सहा ट्रेन सहा महिन्यांत आणि त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरीत ट्रेन पुढील तीन वर्षांत येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मेट्रोची वैशिष्टय़े

  • मेट्रो स्वयंचलित पद्धतीने (चालकरहित) धावणार आहे. परंतु, प्रवाशांना असुरक्षित वाटू नये यासाठी सुरुवातीला मोटारमनसह या ट्रेन धावतील.
  • प्रत्येक ट्रेन 6 कोचची असून एकूण 63 रेल या मार्गावर धावणार आहे.
  • प्रत्येक कोचमध्ये 52 प्रवाशांची आणि 328 प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे.
  • प्रत्येक डब्यात 380 जणांचा प्रवास शक्य असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता 2280 इतकी आहे.
  • प्रत्येक डब्यात दोन सायकली ठेवण्याची व्यवस्थासुद्धा आहे.
  • नगरविकास यांची एकनाथ शिंदे यांनी बंगळूरू येथे जाऊन भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या कंपनीने बनवलेल्या चालकरहित मेट्रोची पाहणी केली. या वेळी कंपनीचे सीएमडी डॉ. होटा, संचालक दीपककुमार बॅनर्जी आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सीजीएम सुमीत भटनागर उपस्थित होते.