मुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय

मुंबईचा इतिहास हा कापड गिरण्यांशिवाय अपुरा आहे. कापड गिरण्या आणि तिथे काम करणारे लाखो गिरणी कामगार यांचे मुंबईसाठी अतुलनीय योगदान राहिलेले आहे. नव्या पिढीला या गिरण्यांचा इतिहास माहित नसेल. तो आता ‘टेक्सटाईल्स म्युझियम’च्या माध्यमातून उलगडणार आहे.

वस्त्रोद्योग आणि मुंबईची प्रगती याचा लेखोजोखा या म्युझियममध्ये मांडला जाणार आहे. या म्युझियमसाठी मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात असलेल्या लालबागच्या इंडिया युनायटेड मिल – 1 च्या जागेवर असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या हेरिटेज इमारतींचे संवर्धन केले जाणार आहे. इंडिया युनायटेड मिल 1890 रोजी बांधली गेली. त्यातील 44 हजार चौरस मीटर जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे.

महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाच्या देखरेखीखाली हे म्युझियम बनवले जाणार आहे. तीन टप्प्यात हे काम होत असून पहिला टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरची त्यात महत्वाची भूमिका आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात महानगरपालिकेकडे माहिती मागितली होती. त्यावर वरिष्ठ पुरातन वास्तू जतन अभियंता संजय आढाव यांनी वरील माहिती दिली.

गिरण्यांमधील तळ्यांच्या परिसरात सुशोभिकरण

म्युझियमच्या पहिल्या टप्प्याचे काम 15 जानेवारी 2019 रोजी सुरू करण्यात आले. गिरण्यांमधील तळी आणि सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण करून बहुउद्देशीय प्लाझा तसेच वस्त्रोद्योगावर म्युरल बनवण्यात येणार आहेत. यावर 6.03 कोटी रुपये खर्च येणार असून त्यातील 1.27 कोटी रुपये मेसर्स सवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहेत. सध्या बहुउद्देशीय प्लाझाचे काम सुरू आहे अशी माहिती गलगली यांना देण्यात आली आहे.

संगीत कारंजी, जलपटलावर लघुपटाचे प्रदर्शन

टप्पा 1 ब अंतर्गत विविध प्रकारच्या नळ्यांद्वारे संगीत कारंजे निर्माण करून जलपटलावर मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास लघुपटाद्वारे प्रदर्शित केला जाणार आहे. चार वर्षात 28 लघुपट बनवले जाणार आहेत.13 नोव्हेंबर 2019 पासून हे काम सुरू झाले. त्यावर 23.57 कोटी रुपये खर्च येणार आहे. मेसर्स देव एस. व्ही. प्रीमियम वल्र्ड कन्सोर्टियम हे काम करणार आहे. दोन्ही कामांमध्ये आर्विâटेक्ट व सल्लागार सर जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहेत. या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे 30.15 लाख रुपये आणि 1.18 कोटी रुपये खर्च येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या