
26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदी दुथडी भरून वाहत होती. त्या भयंकर आपत्तीनंतर केंद्र सरकारने मिठी नदीचा विकास आणि सुरक्षेसाठी मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु गेल्या पंधरा वर्षांत मिठी नदीसाठी केंद्राकडून दमडीही मिळालेली नाही. माहिती अधिकारामध्ये ही बाब उघड झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) यासंदर्भात माहिती मागितली होती. मिठी नदी विकासकामांतर्गत एमएमआरडीए आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेली कामे आणि केंद्राकडे मागणी करण्यात आलेला निधी व त्यातील मिळालेला निधी याबाबत गलगली यांनी माहिती मागितली होती.
मिठी नदीसाठी केंद्र सरकारकडे 1657.11 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील 1239.60 कोटी रुपयांची मागणी पालिकेने व उर्वरित निधीची मागणी एमएमआरडीएने केली होती, परंतु केंद्राकडून काहीच मदत आजमितीस मिळालेली नाही अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.





























































