खिशातच मोबाईलचा स्फोट, मुंबईतील घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अत्यावश्यक गरजांमध्ये समावेश झालेल्या मोबाईलचा वापर तितकाच घातक होत असल्याचेही समोर येत आहे. मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये असलेल्या ‘बगिचा हॉटेल’मध्ये सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने शर्टच्या खिशात दोन मोबाईल ठेवले होते. हॉटेलमध्ये बसले असताना अचानक एका मोबाईलमधून धूर येऊ लागला. काही क्षणातच मोबाईल पेटला. मोबाईल धारकाने फोन दूर फेकताच त्याचा स्फोट झाला. या घटनेत मोबाईल धारकाची छाती आणि बोटाला दुखापत झाली आहे. हा प्रकार पाहून हॉटेलमधील इतर व्यक्तीही सैरावैरा पळत सुटले. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.