मुंबईकरांनो, सावधान! डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात सुमारे दुपटीने वाढ झाल्याने मुंबईचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. सुदैवाने या आजारांमध्ये पावसाळ्यात एकही बळी गेला नसला तरी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण, 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण, 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, ‘एच1एन1’चे 44 रुग्ण आढळले होते. यावर्षी 1 जानेवारीपासून जुलैअखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण 2318, लेप्टोचे 96, डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 तर ‘एच1एन1’चे 28 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

पालिका म्हणते…

  • दरवर्षी जुलैमध्ये होणाऱया अतिवृष्टीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढून मलेरियासारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. यावर्षीही पावसाळी आजार वाढले आहेत. मलेरियाचे जुलै 2020 मध्ये 954 रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी जुलैमध्ये मलेरियाचे 557 रुग्ण आढळल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात रुग्ण कमी आढळल्याचे समोर आले आहे.
  • पावसाळी आजारांसाठी पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांसह कस्तुरबासह सर्व 16 उपनगरीय रुग्णालये व इतर रुग्णालयांत पावसाळी आजारांसाठी बेड उपलब्ध आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठीही आवश्यक असणारी सर्व औषधे पालिकेकडे उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालय, घरोघरी आणि रॅपिड टेस्टच्या माध्यमातून चाचण्याही केल्या जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

असे वाढले महिनाभरात रुग्ण

  • जून 2021 मध्ये मुंबईत मलेरियाचे 357 रुग्ण होते. जुलैमध्ये ही रुग्णसंख्या 557 वर गेली आहे.
  • तर लेप्टो रुग्णांची संख्या 15 वरून 37, डेंग्यू 12 वरून 28, गॅस्ट्रो 180 वरून 294 तर ‘एच1एन’च्या 6 रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली.
  • मलेरिया – 557
  • लेप्टो – 37
  • डेंग्यू – 28
  • गॅस्ट्रो – 294
  • ‘एच1एन1’ – 21

काळजी घ्या

पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. शिवाय घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, असेही पालिकेने म्हटले आहे.