मुंबईत पावसाचा ‘ब्रेक’ डान्स, लोकल सेवा सुरळित सुरू

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळीही जवळपास अर्धा तास मुंबईच्या पूर्व उपनगरात जवळपास 1 तास मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम होतोय की काय असा प्रश्न मुंबईला लोकल ट्रेनने कामानिमित्त येणाऱ्यांना पडला होता. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटीएम- कर्जत/कसारा मार्ग, सीएसटीएम- पनवेल/गोरेगांव, ठाणे- वाशी/पनवेल, बेलापूर/नेरूळ खारकोपर मार्ग या मार्गांवरील वाहतूक सुरळित सुरू आहे. मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली आहे.

राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस होत आहे. येते तीन दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाने परतीचा मार्ग धरला असल्याने पावसाची तीव्रता जास्त असल्याचं हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पुढचे 3 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.