
सामना प्रतिनिधी । मुंबई
बायोमेट्रिक हजेरीच्या घोळामुळे हजारो कर्मचाऱयांचा पगार कापला जातोय. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार करताना सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी अद्याप दूर केलेल्या नाहीत. शिवाय स्थगित केलेल्या गटविमा योजनेमुळे कर्मचाऱयांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या प्रश्नांसाठी आयुक्तांशी अनेक वेळा चर्चा करूनदेखील आश्वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या लाखो कर्मचाऱयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कामगारांच्या असंतोषाचा भडका उडाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.
पालिकेच्या विविध खात्यातील कामगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ, अधिकाऱयांच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत समन्वय समितीच्या माध्यमातून पालिका आयुक्त, प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालिकेचे नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांना समन्वय समितेने निवेदन देऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करावी अशी मागणी केली. यावेळी समन्वय समितीचे बाबा कदम, सत्यवान जावकर, संजय वाघ, ऍड. सुखदेव काशिद, ऍड. महाबळ शेट्टी, वामन कविस्कर, ऍड. प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, सुभाष पवार, दिवाकर दळवी, के. पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर, के. के. सिंह आदी उपस्थित होते.
बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर करा
बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटीमुळे एप्रिलमध्ये पालिकेच्या 70 टक्के कामगारांचे वेतन कापले गेले. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर केल्याशिवाय कामगारांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीशी जोडू नये अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. सातव्या वेतन आयोग करारातील त्रुटी दूर करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्यासमोर बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणीही समितीने केली आहे.
























































