झोपडय़ांमधील व्यावसायिकांकडून मालमत्ता करवसुलीला सुरुवात, चार महिन्यांत 2 कोटी 14 लाख जमा

महसूल वाढवण्यासाठी डिसेंबरच्या अखेरीपासून मुंबई महापालिकेकडून वीज, पाणी तसेच इतर सोयीसुविधा घेणाऱ्या झोपडीपट्टीतील व्यावसायिकांकडून मालमत्ता कर आकारायला सुरुवात केली असून, गेल्या चार महिन्यांत 1 हजार 166 व्यावसायिक गाळय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 957 व्यावसायिकांच्या मालमत्ता या कर आकारणीस प्राप्त ठरल्या असून या व्यावसायिकांना 6 कोटी 73 लाख 71 हजार 451 रुपये कर भरण्यास पालिकेने बजावले आहे. 957 पैकी 321 व्यावसायिकांकडून पालिकेने 2 कोटी 14 लाख 58 हजार 511 रुपयांचा कर वसूल केला आहे.

केंद्र सरकारने जकात कर बंद केल्यानंतर मालमत्ता कर हाच मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. मात्र, मिळणारा महसूल आधीच्या तुलनेने कमी असल्यामुळे महसूल वाढीसाठी मुंबई महापालिकेने अन्य पर्यायही शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी डिसेंबरपासून झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणले गेले आहे. दरम्यान, या करवसुलीतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे 200 कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.

कर कक्षेत आलेले व्यावसायिक 

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरातून 957 जणांच्या मालमत्ता कर कक्षेत आणल्या असून त्यांच्याकडून 6 कोटी 73 लाख 71 हजार 451 कराची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी 321 जणांकडून 2 कोटी 14 लाखांची वसुली महापालिकेने केली आहे. दरम्यान, छोटे व्यावसायिक, फळ, भाजी विव्रेते, हारवाले यांना यातून वगळण्यात आले आहे.

असे केले जातेय सर्वेक्षण  

पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाचा अधिकारी झोपडपट्टीतील दुकानदारांकडून दुकानाचे कागदपत्र मागवतात. कागदपत्राच्या आधारे मालमत्तांचे विश्लेषण करून मालमत्तेची किंमत ठरवली जाते. कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास पालिकेच्या टीमकडून दुकानाची आकारणी केली जाते व त्यानुसार मालमत्ता कर भरण्यास सांगितला जातो.

रेडी रेकनरनुसार मालमत्तांवर कर आकारणी  

महापालिकेकडून सध्या 24 वॉर्डांमध्ये झोपडपट्टीतील दुकानदार आणि व्यावसायिक गाळय़ांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यांना रेडी रेकनरनुसार मालमत्ता कर भरण्यास सांगितले जात आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार 166 झोपडपट्टीतील दुकानदार आणि व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील 957 व्यावसायिकांना मालमत्ता कराच्या कक्षेत आणले आहे.

झालेले सर्वेक्षण 

   मुंबई शहर                193

   पश्चिम उपनगरे        544

   पूर्व उपनगरे              429 

   एकूण                     1166