सोसायटय़ांना पुन्हा कचरा वर्गीकरण बंधनकारक; पालिका 65 हजार सोसायटय़ांना कचरा पेटय़ा वाटणार

मुंबईतील सोसाटय़ांना आता पुन्हा कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मुंबईतील 65 हजार गृहनिर्माण सोसायटय़ांना प्रत्येकी दोन अशा 1 लाख 20 हजार कचरा पेटय़ा दिल्या जाणार आहेत. 120 लिटरची कचरा पेटी असून यासाठी 8 कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत. यात कचरा वर्गीकरण करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीसोबत कारवाई करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. कचरा पेटीसाठी 7030079777 या क्रमांकावर अर्ज केल्यास 10 दिवसांत कचरा पेटीचे दोन डबे घरपोच मिळणार आहेत.

मुंबईत याआधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्यासाठी कचरा पेटय़ांचे वाटप केले जात होते. मात्र निवडून आलेले नगरसेवक नसल्याने प्रशासनाच्या माध्यमातून कचरा डब्यांचे वाटप केले जाणार आहे. यापूर्वीही सुका कचरा, ओला कचरा वर्गीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून सोसायटय़ांना सातत्याने आवाहन केले होते. सुरुवातीला याची सोसायटय़ांनी अंमलबजावणी केली, त्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. ओल्या व सुक्या कचऱयाचे वर्गीकरण केले जात नसून अनेक ठिकाणी कचरा कुठेही फेकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे मोफत कचरा पेटय़ा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

रस्त्यांवर डेब्रिज टाकणाऱयांवर कारवाई
मुंबईत मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू असून रस्त्यावर, उघडय़ावर डेब्रिज टाकले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यांवर डेब्रिज टाकणाऱया डंपरवर सीसीटीव्ही कॅमराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते आहे. डंपरमधून कचरा रस्त्यावर टाकताना आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.