
‘सैराट’ चित्रपटाद्वारे याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानिमित्त मंगेश दराडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद..
केबीसी मराठीची ऑफर आली तेक्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
‘केबीसी’सारख्या गाजलेल्या शोसाठी सूत्रसंचालक म्हणून मला ऑफर मिळाली हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी अशाच पद्धतीचा शो करू शकेन, असा मला मनोमन विश्वास होता. त्यामुळे या शोला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. टीव्ही जगतातला हा आजवरचा सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याची वेगळी शैली आहे. अशा शोचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मीदेखील खूप उत्साहित आहे.
शोसाठी काय तयारी केलीत?
सूत्रसंचालन आणि छोटय़ा पडद्यावर पदार्पण या दोन्ही गोष्टी मी पहिल्यांदाच करतोय. दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांनी वेळोवेळी माझ्या कामाला पसंती दिली. पण कलाकार म्हणून मी फारसा लोकप्रिय नाही. यानिमित्ताने पहिल्यांदाच मी पूर्ण केळ पडद्यावर प्रेक्षकांसमोर येणार आहे. तयारीबाबत बोलायचे तर जेवढे शिकता येईल तेवढे मी शिकतोय. या शोचे वेगवेगळय़ा भाषेतील, वेगवेगळय़ा देशांतील एपिसोड पाहिले. कशा पद्धतीने सूत्रसंचालन करतात याचा अभ्यास केला. मी स्वत;कडे जास्त लक्ष देणारा माणूस नाही. पण पडद्यावर काम करताना चांगले दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे लूकवरही मेहनत घेतली.
शोच्या प्रमोशनसाठी तुम्ही रॅप साँगही गायले आहे. कसा होता हा अनुभव?
या गाण्यात मी दोनच ओळी गायल्या आहेत. त्यामुळे गायलो म्हणायचं की गुणगुणलो म्हणायचं तो वेगळाच भाग आहे. सोनी मराठीचे अजय भालवणकर आणि संगीत दिग्दर्शक ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या आग्रहामुळे मी हे आव्हान स्वीकारले.
‘झुंड’च्या निमित्ताने बिग बी यांच्यासोबत तुम्ही काम केले आहे. त्यांनी या शोसाठी काही टिप्स दिल्या का?
मी केबीसी मराठीचे सूत्रसंचालन करतोय ही गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी स्मितहास्य देऊन मला शुभेच्छा दिल्या. वेगळय़ा टिप्स अशा काही त्यांनी दिल्या नाहीत, पण त्या महानायकाला बघूनच तुम्हाला खूप काही शिकता येते. लहानपणापासून त्यांचे काम बघत आल्याने अभिनेते म्हणून ते किती मोठे आहेत हे माहीत होते. पण या सिनेमाच्या निमित्ताने व्यक्ती म्हणूनही त्यांचे मोठेपण पाहायला मिळाले.
‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ असे यंदाच्या सीझनचे स्लोगन आहे. खऱया आयुष्यात तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले आहे का?
खऱया आयुष्यात मला एका वाक्यात कधीच उत्तर मिळाले नाही. आयुष्याच्या टप्प्यावर प्रश्न नेहमीच आपल्यासमोर उभे राहत असतात. आपल्यालाच प्रश्नांची योग्य उत्तरे शोधत पुढे जायचे असते आणि उत्तर शोधले की आपल्यात काही ना काही बदल होत असतो. ही सर्वात महत्वाची आणि रंजक प्रक्रिया आहे. केबीसी करणार का? हासुद्धा माझ्यापुढे आलेला प्रश्नच होता. हो म्हणून मी त्यावर उत्तर शोधले आणि बदल घडलेला तुम्ही बघताय.



























































