‘नवाकाळ’कार झुंजार संपादक नीळूभाऊ खाडिलकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या धारदार लेखणीने गोरगरीब, कष्टकऱयांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे ‘अग्रलेखांचे बादशहा’ ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी आणि कन्या जयश्री, वासंती आणि रोहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील धडधडती तोफ शांत झाली, अशा भावना व्यक्त होत आहेत.

नीळकंठ खाडिलकर यांना प्रकृति अस्वास्थ्यामुळे रविवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री अविनाश महातेकर, आमदार एकनाथ शिंदे, आमदार नवाब मलिक, राम कदम, भाई जगताप, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा तसेच डॉ. तात्याराव लहाने, नाटककार गंगाराम गवाणकर, लेखिका विजया वाड, ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राधाकृष्ण नार्वेकर, नरेंद्र वाबळे आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. चंदनवाडी स्मशानभूमीत अनेकांनी खाडिलकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली.

उद्धव ठाकरे यांनी घेतले अंत्यदर्शन
नीळकंठ खाडिलकर यांचे पार्थिव दैनिक ‘नवाकाळ’ च्या गिरगाव कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

कष्टकऱयांचा आवाज आणि खपाचा विक्रम
नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म 6 एप्रिल 1934 रोजी झाला. नाटय़ाचार्य आणि ‘केसरी’चे माजी संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ते नातू होते. अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.ए.ऑनर्सचे शिक्षण घेतले होते. दै. ‘नवाकाळ’ या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. या काळात त्यांनी लिहिलेले अग्रलेख फार गाजले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही उपाधी त्यांना मिळाली. ‘नवाकाळ’ हे दैनिक गोरगरीब, कष्टकऱयांचा आवाज बनवून लाखोंचा खपाचा विक्रम केला. अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही खाडिलकर यांची ओळख होती. गोळकलकर गुरुजी, सत्य साईबाबा यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती फार गाजल्या होत्या.

खाडिलकर यांना 1992 साली ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, कऱहाडचा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

ग्रंथसंपदा
खाडिलकर यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘राजे शिवाजी’, ‘रामायण’, ‘श्रीकृष्ण’, ‘महात्मा गांधी’, ‘संत तुकाराम’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’, ‘महात्म्यांचा महात्मा-जोतिबा फुले’, ‘हिंदुत्व’, ‘टॉवर्स’, ‘नाटय़ाचार्य खाडिलकरांची नाटय़कला’, ‘मराठी’, ‘आचार्य अत्रे-झंझावात’ या पुस्तकांचे लेखन केले. ‘लेखननामा’, ‘अग्रलेखांचा बादशहा’, ‘शूरा मी वंदिले’, ‘बादशाही अग्रलेख’, ‘माझा मऱहाठीचा बोलु कौतुकें’ हे अग्रलेखांचे संग्रह तसेच गिरणी कामगार आणि मुंबईच्या समस्यांवर पुस्तकेही लिहिली.