
घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोडमार्गाच्या रुंदीकरणामुळे बाधित होणारी 24 बांधकामे पालिकेने धडक कारवाई करीत हटवली. पालिकेच्या ‘एन’ वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या बाधितांना पालिकेच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
पालिकेच्या वतीने घाटकोपर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोडमार्गादरम्यान 15.25 मीटर रुंदीचा विकास नियोजित रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या 24 बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले. तसेच याच परिसरात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) यांच्याकडून नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान बाधित होणाऱ्या 35 बांधकामांचे निष्कासन करण्याची कारवाईदेखील प्रगतिपथावर आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या कामकाजात अडथळा ठरणाऱ्या मालमत्ताधारकांना रीतसर सूचना देऊन ही कारवाई करण्यात आली.
























































