म्हाडाच्या एका घरासाठी 300 अर्जदारांमध्ये चुरस, 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या म्हणजेच 20 टक्के योजनेतील 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1,70,135 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये चुरस आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई येथील 5285 घरे तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता अर्ज नोंदणीला 15 जुलैपासून सुरुवात झाली होती. घरांसाठी अर्ज करण्याची 12 सप्टेंबरपर्यंत, तर आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत होती.

सोमवारी सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 5285 घरे आणि 77 भूखंडांसाठी 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,58,424 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. 20 टक्के योजनेतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती दिली असून 1,70,135 अर्जदारांपैकी 1,46,432 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. 15 टक्के योजनेंतर्गत 3002 घरांसाठी एकूण 5953 अर्ज, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या 1677 घरांसाठी 6346 अर्ज, 50 टक्के परवडणाऱ्या 41 घरांसाठी 1704 अर्ज, तर 77 भूखंडांसाठी 856 अर्ज आले आहेत.