
अमेरिकेतून हिंदुस्थानात सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या क्रू मेंबरला डीआरआयने मुंबई विमानतळावर अटक केली आहे. याप्रकरणी क्रू मेंबरसह सिंडिकेटच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 1373 ग्रॅम तस्करी केलेले सोने हस्तगत करण्यात आले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत 1.41 कोटी रुपये आहे.
13 जून 2025 रोजी न्यूयॉर्कहून मुंबईत आलेल्या AI-116 या विमानातील एका पुरुष क्रू मेंबरचा सोने तस्करीत सहभाग असल्याची माहिती डीआयआरला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने क्रू मेंबरची झडती घेतली असता सुरवातीला कोणतीही वस्तू सापडली नाही. मात्र सतत चौकशी केल्यानंतर विमानातील बॅगेज सर्व्हिसेस एरियाजवळ काळ्या डक्ट टेपमध्ये गुंडाळलेले सोन्याचे बार असलेले पाऊच लपवून ठेवल्याचे कळले.
अधिकाऱ्यांनी हे पाऊस जप्त करत तपासणी केली असता आत 1373 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार आढळून आले. याआधीही हिंदुस्थानात सोन्याची तस्करी केल्याची कबुली क्रू मेंबरने दिली. यानंतर सिंडिकेटच्या मास्टरमाइंडलाही अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.