
गिरगाव चौपाटी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेले ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप बंद करण्याचा घाट ‘भाजप-मिंधे’ सरकारने घातला आहे. त्यामुळे गिरगाव रंगभूमी दालनाची जागा कोणत्या बिल्डर मित्राला देणार, असा सवाल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज एक्स पोस्ट करीत मराठीद्वेष्ट्या भाजपचा बुरखा वरून) फाडला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात एकीकडे मराठी भाषेची गळचेपी होत असताना मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करून घोंगडं भिजवत ठेवायचं!, असा सरकारचा डाव असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? भाजप हे सगळं कशासाठी करतंय? मराठीद्वेष्टय़ा भाजपचा हा खेळ मुंबईकर वेळेत ओळखणार का?
मराठीद्वेषी भाजपाचं चाललंय तरी काय?
आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे! त्याविरुद्ध आंदोलन सुरू असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना ‘मराठीद्वेषी’ भाजपचं मागल्या दाराने चाललंय तरी काय, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.