
दोन बांधकाम व्यावसायिकांनी एका योगा शिक्षिकेची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांविरोधात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. जयेश आणि गौरव या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार महिला योगा शिक्षिका या यारी रोड-वर्सोवा परिसरात राहतात. त्यांना मीरा रोड येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी कांदिवलीतील कंपनीच्या कार्यालयात भेट घेऊन या दोन्ही संचालकाची भेट घेतली होती. यावेळी तिथे त्यांच्या मीरा रोड येथील इमारतीमध्ये सोळाव्या मजल्यावर एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने 38 लाख रुपय पेमेंट दिले होते. या पेमेंटनंतर शिक्षिकेच्या नावाने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले. यावेळी या दोघांनी तिला काही दिवसांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा करूनही तिला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.