
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. आता ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाच्या समोरील शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडे पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिंतीच्या उखडलेल्या लाद्यांच्या आतमध्ये अत्यंत अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाच्या समोरच शिवराज्याभिषेकाचे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पावर रात्रीच्या वेळेस स्पॉटलाईटही सोडण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस हे शिल्प अत्यंत देखणे दिसते, पण सध्या या शिल्पाच्या तळाकडील भिंतीच्या लाद्या उखडल्या आहेत. या भिंतीला पडलेल्या भगदाडामध्ये अत्यंत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भिंतीला किमान पाच ते सहा ठिकाणी भडदाडे पडली आहेत. पण महापालिका व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या शिल्पाच्या दुरवस्थेकडे या भागातील जागरुक नागरिक सचिन ठाकूर यांनी लक्ष वेधले. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सर्वच पुतळय़ांचा विषय संवेदनशील झाला आहे. शिवराज्याभिषेकाचे सुंदर शिल्प बांधण्यात आले आहे. पण देखभालीअभावी या शिल्पाची दुरवस्था झाली आहे. शिवाजी पार्कमधील उडणाऱया धुळीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या धुळीचे थर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ापासून शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या शिल्पावरही पसरलेले असतात. या धुळीच्या साम्राज्यामुळे राज्याभिषेक सोहळय़ाच्या शिल्पाची रया निघून जात आहे.
देखभालीकडे दुर्लक्ष
शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु प्रशासनानेच त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या पुतळय़ावरील रोषणाई अनेकदा बंद असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पुतळा अनेकदा काळोखात असतो, अशी नागरिकांची तक्रार आहे.