
दुर्मिळ हिऱ्याच्या खरेदीच्या नावाखाली फेरफेरी करून हिरे व्यावसायिकाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. खऱ्या हिऱ्याच्या ऐवजी नकली हिरा ठेऊन दोघांनी पळ काढला. या प्रकरणी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे गिरगाव परिसरात राहतात. ते डायमंड विक्रीचे काम करतात. त्याना दक्षिण मुंबईतील झव्हेरी बाजार येथे घर घ्यायचे होते. घर घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित नीलम हिरा असलेली अंगठी विकण्याचा निर्णय घेतला. त्या अंगठीबाबत त्यांनी त्यांच्या परिचित असणाऱ्या एजंटना सांगितले होते.
त्यानुसार काही दिवसांपूर्वी एक जण त्यांच्याकडे आला. त्याने नीलम हिरा असलेली अंगठी खरेदी करू इच्छित असल्याचे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी ती दुर्मिळ नीलम हिरा असलेली अंगठी 27 लाखांना विकणार असल्याचे सांगितले. ठरल्यानुसार दोन जण त्यांच्याकडे आले. त्याने हिऱ्याची पारख करून घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी हिऱ्याची पारख केली. ती हिरे असलेली अंगठी घेणार असल्याचे भासवले. अंगठीसाठी पैसे घेऊन येतो असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार हे ती अंगठी जपून ठेवण्यासाठी डब्बा आणण्यासाठी आतील घरात गेले. तेव्हा संधीचा फायदा घेऊन त्या दोघांनी हेराफेरी केली. खरा नीलम हिरा असलेल्या अंगठीच्या जागी बनावट अंगठी ठेवली. पैसे घेऊन येतो असे सांगून ते परत आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली.