Mumbai News – घरगुती वादातून भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकले, महिलेचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती वादातून पतीने भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंधेरी परिसरात घडली. पंचभिला राजेश छत्रे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून राजेश एकनाथ छत्रे असे आरोपी पतीचे नाव आहे. अंधेरी पूर्वेकडील सागाबग रोडवर शनिवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला. घटनास्थळी उपस्थित एका रिक्षाचालकाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी मृताचे आणि आरोपीचे कपडे, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि घटनास्थळावरील इतर नमुने पुरावा म्हणून ताब्यात घेतले. अथक शोध घेत पोलिसांनी रविवारी मध्यरात्री आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.