
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. परमबीर यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी लीलावती रुग्णालयातील त्यांच्या लाचखोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.
मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने परमबीर सिंग यांना ज्या पद्धतीने अपमानास्पदरीत्या बडतर्फ केले त्यावरून त्यांचे चारित्र्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्यांच्या पापाचा घडा आता भरला असल्याची टीका अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
परमबीर सिंग यांनी लीलावती रुग्णालयातील अनेक डॉक्टरांकडून बढतीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांची लाच वसूल करण्याचा उद्योग सुरू केला होता. लीलावती रुग्णालयाचे ट्रस्टी व डॉक्टरांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यांमुळे आणि गैरवर्तनामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांना पदावरून काढून टाकले आहे. पोलीस दलातील परमबीर सिंग यांची भ्रष्ट, गुन्हेगारी आणि वादग्रस्त कारकीर्द पाहता लीलावती रुग्णालयातील लाचखोरीची सखोल चौकशी करून त्यांचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचं असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.


























































