
मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 14 तसेच 12 च्या संयुक्त विद्यमाने उद्या, रविवारपासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे 28 वे वर्ष असून या महोत्सवात कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महाआरती तसेच पारंपरिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, विविध लोकप्रतिनिधी या मालवणी महोत्सवास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात रोज सायंकाळी 7 वाजता श्री देव वेताळाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री 8 वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख आणि मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे आणि सचिव वसंत सावंत यांनी दिली.



























































