Mumbai News – बोगस कागदपत्रांच्या आधारे मलावीला जाण्याचा प्रयत्न, मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे मलावीला जाण्याचा प्रयत्नात असलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. कृष्णकुमार रविचंद्रन थेवर (29) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव असून, तो नवी मुंबईतील उलवे येथील रहिवासी आहे. 1 जून 2025 रोजी, कृष्णकुमार नैरोबीमार्गे मलावीला केक्यू-203डी फ्लाइटने प्रवास करणार होता.

इमिग्रेशन क्लिअरन्स प्रक्रियेदरम्यान, अधिकाऱ्यांना त्याच्या कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल संशय आला. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची सविस्तर तपासणी केली असता त्याच्या सीडीसीमधील स्टॅम्प पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी आरोपीकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यात पासपोर्ट, बोर्डिंग पास, ई-मायग्रेट लेटर आणि जहाज जॉईनिंग लेटर याचा समावेश आहे. ही कागदपत्रे आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकुमारने नवी मुंबईतील बिजेंद्र सिंग नावाच्या एजंटशी संगनमत करून एमटी महिका, एमटी ब्लू एप्रिल, एमटी व्हर्जिनिया एन, एमटी प्रोग्रेस 6 आणि एमटी डॅनम 23 जहाजांचे बनावट स्टॅम्प बनवले होते.

कृष्णकुमारविरोधात सहार पोलीस ठाण्यात बनावटगिरी, फसवणूक आणि इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस एजंट बिजेंद्र सिंगचाही शोध घेत आहेत.