आरोग्य विभागातील कर्मचारी बोनसपासून वंचित, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पालिका आयुक्तांना निवेदन

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारे तब्बल पाच हजार कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांना बोनस मिळावा या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांना निवेदन दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बोनस जाहीर केला आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमादेखील झाला. मात्र आरोग्य विभागातील शेकडो आरोग्य्यसेविका तसेच एन, एच, एम विभागातील पालिकाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, प्लाझ्मा सेंटर कंत्राटी कर्मचारी तसेच डीएस इंटरप्राईजेस या खासगी ठेकेदारांतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या नर्स फार्मासिस्ट डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना या वेळेस दिवाळीच्या बोनसपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले. यावेळी सरचिटणीस सत्यवान जावकर, संजय वाघ, संजय बापेरकर व देवेंद्र सावंत तसेच शेकडो कामगार उपस्थित होते.

म्युनिसिपल कामगार सेनेच्या मागणीला यश

क्षयरोग विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त चहल यांनी दिवाळी बोनस देण्यास सुरुवात केली होती, मात्र मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी घोषित करूनही टीबी कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला नाही. परंतु अध्यक्ष बाबा कदम यांनी आयुक्तांना क्षयरोगअंतर्गत कामगारांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी आयुक्तांनी त्यांना या वर्षीचा बोनस दिला. तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत 1200 कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळावा यासाठीदेखील आयुक्तांना निवेदन देण्यात आले. बोनस देण्यास आयुक्त सकारात्मक असल्याचे बाबा कदम यांनी सांगितले. तसेच आयुक्तांनी उपायुक्त चौरे यांना तसे आदेशही दिले व इतरही मागण्या मांडण्यात आल्या.