वरळी बीडीडीतील 556 घरांचा 15 ऑगस्टपर्यंत ताबा

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींच्या सुरू असलेल्या पुनर्विकासात एकूण 15 हजार 600 भाडेकरूंचे पुनर्वसन होणार असून वरळीमध्ये 556 घरांच्या चाव्यांचे वाटप 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळवासीयांचे मोठय़ा घराचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे.

विधानसभेत नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकल्पामधील  एकूण सदनिकांपैकी 25 टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसनही होत असून या भागातून जाणाऱया पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समूह पुनर्विकासाला गती देणार

मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीबी नगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली असून 4900 रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा, अभ्युदयनगर इथल्या समूह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर 2025पर्यंत ती पूर्ण होईल. 11 हजार 411 भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ 2010 रहिवाशांना होणार आहे त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही शिंदेंनी दिली.