विद्यार्थ्यांना दुसऱ्या जागेत हलवण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा! शिवसेनेचा विवेकानंद एज्युकेशन सोसायटीला आंदोलनाचा इशारा

चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीने कलेक्टर कॉलनी येथील पाचवी ते दहावीचे वर्ग सिंधी सोसायटीमधील इमारतीत स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा 700 विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार आहे. सोयीसुविधांवर ताण वाढणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचाही याला विरोध आहे. त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांना दुसऱ्या जागेत हलवण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा नाहीतर गुरुवार 12 जूनला कलेक्टर कॉलनीतील शाळेच्या परिसरात पालक, विद्यार्थ्यांसह भव्य मानवी साखळी तयार करून निषेध आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीला दिला आहे.

कलेक्टर कॉलनी आणि सिंधी सोसायटीतील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या इमारतीमध्ये प्राथमिक, माध्यमिक व इतर विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळा व्यवस्थापनाने अचानकपणे पाचवी ते दहावीतील पालकांना नोटीस काढून 2025-2026 या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जून महिन्यापासून कलेक्टर कॉलनीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर सिंधी सोसायटीमधील इमारतीमध्ये करणार असल्याचे कळवले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज.मो. अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधून संस्थेच्या व्यवस्थापनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. मात्र शाळा प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी भव्य निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे.