थीमच्या ट्रेंडमुळे गणरायाच्या मूर्ती महागल्या; कारागिरांची कमतरता… वेळही जास्त लागतो, किमतीत 25 टक्क्यांची वाढ

गेल्या काही वर्षांत डेकोरेशनच्या थीमनुसार बाप्पाची मनपसंत मूर्ती बनवून घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे. आधीच कारागिरांची कमतरता, त्यातच थीमनुसार मूर्ती घडवण्यासाठी वेळ लागत असल्याने या मूर्तींची किंमत 20 ते 25 टक्क्यांनी वाढली आहे. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या एक ते सव्वा फुटाच्या मूर्तीसाठी भक्तांना 10 ते 15 हजार मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, आठ ते दहा महिने आधीच या मूर्तीचे बुकिंग करावे लागते.

बाप्पाच्या आगमनाला जेमतेम दीड महिना राहिला असून वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गणेशचित्र कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची अहोरात्र लगबग सुरू आहे. डेकोरेशनच्या थीमनुसार मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहेत. याबाबत माहीम मच्छीमार कॉलनी येथील मूर्तिकार केतन विंदे म्हणाले, डेकोरेशनला अनुसरून बाप्पाच्या मूर्तीची ऑर्डर आम्हाला आठ ते दहा महिने आधीच दिली जाते. ग्राहक एखादे चित्र आमच्याकडे घेऊन येतात किंवा एखादी थीम सांगून त्यानुसार आमच्याकडून बाप्पाची मूर्ती तयार करून घेतात. चित्रात किती डिटेल्स आहेत यावर मूर्तीचे मानधन ठरते.

मागणी वाढली, पण कारागीर मिळेना

शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी वाढली असली तरी हा व्यवसाय ठरावीक सिझनपुरता मर्यादित असल्यामुळे आजची तरुण पिढी या व्यवसायाकडे वळत नाही, असे मूर्तिकार केतन विंदे यांनी सांगितले.

  • पारंपरिक शाडूची मूर्ती साकारण्यासाठी एक दिवस लागतो तर थीमनुसार मूर्ती साकारण्यासाठी सहा दिवस लागतात. या मूर्तीमध्ये नाजूक काम असल्यामुळे मुंबईच्या खड्डय़ांतून त्या मूर्ती भाविकांच्या घरी आणि विसर्जनस्थळी सुखरूप पोहोचतील, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.