मुंबईतील 17 वॉर्डांत लागणार दोन ईव्हीएम; घाटकोपरमध्ये सर्वाधिक 21 उमेदवार रिंगणात, 11 वॉर्डांतील दुहेरी लढतींकडे सर्वाचे लक्ष

राजकीय जीवनात उतरून नगरसेवक होण्याचे धुमारे नवीन पिढीला फुटत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्याही वाढत आहे. मुंबई महापालिकेतील किमान सतरा वॉर्डांमध्ये किमान सोळा उमेदवारांपासून 21 उमेदवार रिंगणात आहेत. एका बॅलेट युनिटवर पंधरा उमेदवारांची नावे, चिन्हे आणि एक नोटाचे मत अशी सोळा बटणे असतात. त्यामुळे या सतरा वॉर्डांमध्ये मतदानासाठी दोन ईव्हीएमची (बॅलेट युनिट) गरज भासणार आहे.

मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांमध्ये 1 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात काही वॉर्डांत किमान पंधरा, काही वॉर्डांत 16, 18, 19, 20 आणि एका वॉर्डमध्ये तर तब्बल 21 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. किमान सतरा वॉर्डामध्ये दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगासमोरील डोकेदुखी वाढणार आहे. यातील अनेक लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार

घाटकोपर (पू) प्रभाग क्रमांक 125 मध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धारावीतील वॉर्ड क्रमांक 188मध्ये 20 उमेदवार रिंगणात आहेत. जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक 78 आणि चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 148मध्येही 19, वॉर्ड क्रमांक 181मध्ये 19 उमेदवार रिंगणात आहेत. मानखुर्द वॉर्ड क्रमांक 143मध्ये 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या प्रभागात दुहेरी लढत

मुंबईत वॉर्ड क्रमांक 6, 11, 13, 15, 18 19, 46, 132, 191, 198, आणि 226 या वॉर्डांत दुहेरी लढत आहे. त्यातील अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया दादरमधील 191 वॉर्डमध्ये शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत आणि शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांच्या लढतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. कुलाब्यातील 226 वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे.

माहीममध्ये दोन मिलिंद वैद्य

माहीमच्या वॉर्ड क्रमांक 182मध्ये चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद दत्ताराम वैद्य रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर मिलिंद हरेश्वर वैद्य नावाचे अपक्ष उमेदवार आहेत. मिलिंद दत्ताराम वैद्य यांना मत देताना मतदारांना मशाल चिन्ह पारखूनच मतदान करावे लागणार आहे.